यंदाचा उन्हाळा घामटा काढणार; हवामान खात्याचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दरवर्षीपेक्षा यंदाचा उन्हाळा जास्तच तीक्र असणार, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. मार्च ते मे या कालावधीत देशभरातील तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता असून महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्ये उष्णतेच्या लाटांनी भाजून निघतील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच मार्चमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत आगामी तीन महिन्यांच्या हवामानाबद्दलची माहिती दिली. प्रशांत महासागरात गेल्या वर्षी ‘अल निनो’ सक्रिय झाला होता. ही स्थिती मे महिन्यापर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज जागतिक स्तरावरील हवामानतज्ञांनी व्यक्त केला होता. आता ‘अल निनो’ची तीक्रता कमी होत आहे. मोसमी पावसाच्या आरंभापर्यंत ही स्थिती पूर्णपणे निवळलेली असेल. त्याचबरोबर हिंद महासागरातील इंडियन ओशन डायपोलही मार्च ते मे या उन्हाळय़ाच्या काळात सक्रिय नसेल, असे डॉ. महापात्रा म्हणाले. ‘अल निनो’ची तीक्रता कमी होत असली तरी त्याचा परिणाम तापमानवाढीवर होणार आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा जास्त कडक असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. या उन्हाळय़ात उष्णतेच्या लाटाही सरासरीपेक्षा जास्त येऊ शकतात. महाराष्ट्र, ओडिशासह दक्षिणेतील तेलंगणा, कर्नाटक, तामीळनाडू, पश्चिम बंगाल आदी राज्यांना उन्हाचे जबर चटके बसण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.

देशभरात मार्चमध्ये साधारण 30 मि.मी. पाऊस पडतो. 1971 ते 2020 या कालावधीत नोंद करण्यात आलेल्या मार्चमधील पावसाची सरासरीदेखील 29.9 मि.मी. आहे, मात्र यंदा मार्चमध्ये सरासरीच्या 117 टक्के पावसाची शक्यता आहे. पावसाबरोबरच मार्चमध्ये पाराही चाळिशी ओलांडणार असल्याची शक्यता डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी वर्तवली.