
सामना प्रतिनिधी । मुंबई
स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिकेने संपूर्ण मुंबईतील झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांसाठी 22 हजार शौचकूप बांधण्याचे ठरवले आहे. वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत या आधी बांधलेली शौचालये पाडून त्या ठिकाणी दुमजली शौचालये बांधण्यात येणार आहेत. सामूहिक शौचालये बांधताना त्यात किमान एक शौचकूप पाश्चिमात्य पद्धतीचे (कमोड) बांधावे, अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे सध्या नव्याने बांधकाम सुरू असलेल्या शौचालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सुविधा मिळणार आहे.
सार्वजनिक शौचालयांमध्ये बैठक व्यवस्था भारतीय पद्धतीची असल्यामुळे वस्ती, चाळींमध्ये राहणाऱया ज्येष्ठ नागरिकांना या शौचालयांचा वापर करताना त्रास होत असतो. गुडघ्यांची दुखणी बळावलेल्यांना किंवा वृद्धांना शौचालयांचा वापर करता येत नाही. घरातच शौचालय असलेली कुटुंबे अशा परिस्थितीत शौचकूपाची व्यवस्था बदलून पाश्चिमात्य व्यवस्था करवून घेतात. मात्र सामूहिक शौचालयांचा वापर करणाऱया ज्येष्ठांना मात्र अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे नव्याने बांधण्यात येणाऱया शौचालयांमध्ये कमोड बसवणे बंधनकारक करावे, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांनी केली होती. पालिका प्रशासनाने या मागणीचा विचार केला असून भविष्यात बांधण्यात येणाऱया सामूहिक शौचालयांमध्ये एक कमोड असावे, अशी अट घालण्यात आल्याचे प्रशासनाने लेखी उत्तरात म्हटले आहे.
मुंबईमध्ये दररोज लाखो लोक येत असतात. त्यांच्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने पैसे द्या व वापरा या तत्त्वावर बांधण्यात येणाऱया सर्व शौचालयांमध्येही पाश्चिमात्य पद्धतीच्या शौचकुपांची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रचालक संस्थांना देण्यात आल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. दिव्यांग व्यक्तींकरिता रॅम्प व रेलिंगची व्यवस्था करण्याबरोबरच नवीन शौचालय बांधताना स्वयंसेवी संस्थांना आराखडय़ामध्येही पाश्चिमात्य शौचकूपाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे प्रशासनाने आपल्या लेखी अभिप्रायात म्हटले आहे.
स्वच्छता अभियानांतर्गत पालिकेतर्फे 22 हजार शौचकूपे बांधली जाणार आहेत. नव्याने बांधण्यात येणाऱया शौचालयांसोबतच धोकादायक परिस्थितीत असणारी शौचालये तोडून त्याठिकाणी पुनर्बांधकाम करण्यात येणाऱया शौचालयांचा समावेश आहे.
जुन्या 14 हजार 173 शौचकुपांच्याच जागेत 16 हजार 703 शौचकुपांचे बांधकाम करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त 6 हजार 71 शौचकुपे ही पूर्णपणे नव्याने बांधण्यात येणार आहेत.
मात्र पाश्चिमात्य शौचकूपासाठी पाण्याची जास्त गरज लागत असल्यामुळे त्याची व्यवस्था पालिकेने केली नाही तर कमोड वापरात आल्यानंतर पाण्याविना त्याचा वापर करता येणार नाही.


























































