Commonwealth Games – पुरुष टेबल टेनिसमध्ये हिंदुस्थानला सुवर्णपदक, पदकांचा आकडा पोहोचला 13 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रकुल स्पर्धेत हिंदुस्थानची पदकांची लयलूट सुरूच आहे. मंगळवारी रात्री पुरुष टेबल टेनिसचा अंतिम सामना जिंकत हिंदुस्थानी संघाने सुवर्णपदक पटकावले. हरमीत देसाई व जी साथियान यांनी जबरदस्त कामगिरी करत हिंदुस्थानला सुवर्ण पदक मिळवून दिले. अंतिम सामन्यात हिंदुस्थानी संघान सिंगापूरचा 3-1 असा पराभव केला.

पुरुषांच्या टेबल टेनिसमध्ये हरमीत देसाई व जी साथियान यांनी चांगली सुरुवात करून देत हिंदुस्थानला 1-0 अशी आघाडी घेऊन दिली होती. मात्र काही वेळातच सिंगापूरने 1-1 अशी बरोबरी केली. मात्र त्यानंतर देसाई व साथियान या जोडीने सिंगापूरच्या टीमला खेळूच दिले नाही. सलग 2 सेट आपल्या नावावर करत 3-1 ने सिंगापूरचा पराभव केला.

राष्ट्रकूल स्पर्धेत आतापर्यंत हिंदुस्थानने एकून 13 पदक मिळवले आहेत. ज्यात पाच सुवर्णपदक, पाच रौप्यपदक व तीन कांस्य पदकांचा समावेश आहे. या तेरा पदकांमधील आठ पदकं ही वेटलिफ्टिंगमधील आहेत. महिला लॉन्स बॉल टीमने व पुरुष टेबल टेनिस टीमने प्रत्येकी एक पदक पटकावले. जुडोमध्ये हिंदुस्थानला दोन पदकं मिळाली असून बॅडमिंटनमध्ये एक पदक मिळाले आहे.

पुरुषांच्या टेबल टेनिसमधील सांघिक स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले आहे. 2018 ला गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही पुरुष टेबल टेनिस संघाने सुवर्ण पदक जिंकले होते.