
खासगी टॅक्सी चालकाची तक्रार करण्यासाठी ऑनलाइनवर नंबर शोधणे महिलेला चांगलेच महागात पडले आहे. सायबर ठगाने महिलेला अॅप डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या बँक खात्यातून 98 हजार रुपये काढले. याप्रकरणी आरे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार या गोरेगावला राहतात. डिसेंबरमध्ये त्यांनी एक खासगी कंपनीची रिक्षा बुक केली. रिक्षा बुक केल्यावर त्यांना 500 रुपये भाडे दाखवले.परंतू त्यांच्या घराजवळ रिक्षाऐवजी टॅक्सी आली आणि टॅक्सीचे भाडे 1380 रुपये दाखवले. त्यावरून चालकाबरोबर तक्रारदार यांचा वाद झाला. त्याची तक्रार करण्यासाठी तक्रारदारांनी ऑनलाइनवर नंबर सर्च केला. त्या नंबरवर फोन केला असता ठगाने तक्रारदार यांना एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. ते अॅप डाउनलोड केल्यास पैसे परत मिळतील अशा भूलथापा मारून तक्रारदार यांच्या खात्यातून 98 हजार रुपये काढले गेले. याप्रकरणी आरे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.





























































