इस्रायलच्या हल्ल्यानंतर पंतप्रधानांचा कतारच्या अमीरांशी संवाद; सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाचा केला निषेध

जागतिक अशांततेच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर चिंता व्यक्त होत आहे. इस्रायल- हमास, इस्रायल- इराण संघर्षानंतर आखाती देशातील वातावरण तणावाचे आहे. आता युद्ध थांबले असले तरी आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. इस्रायलच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारच्या अमीरांशी संवाद साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि दोहा येथे झालेल्या अलीकडील हल्ल्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाचा निषेध व्यक्त केला.

कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांच्याशी मोदी यांनी संवाद साधला आणि दोहा येथे झालेल्या हल्ल्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. आपण या आतंरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाचा निषेध करतो, असे मोदी यांनी म्हटले आहे. आम्ही संवादाद्वारे आणि राजनैतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्राधान्य देतो. जगभरात वाढणारा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. या प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेच्या समर्थनात आणि सर्व प्रकारच्या आणि प्रकटीकरणातील दहशतवादाच्या विरोधात हिंदुस्थान ठामपणे उभा आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) मते, पंतप्रधानांनी प्रादेशिक शांतता आणि स्थिरता वाढविण्यात कतारने बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले, ज्यामध्ये युद्धबंदी साध्य करण्यासाठी आणि सर्व ओलिसांची सुटका करण्यासाठी मध्यस्थी प्रयत्नांचा समावेश आहे. शेख तमीम यांनी पंतप्रधान मोदी यांचे कतारच्या जनतेशी आणि राज्यासोबत एकता व्यक्त केल्याबद्दल आभार मानले. दोन्ही नेत्यांनी भारत-कतार धोरणात्मक भागीदारीतील सातत्यपूर्ण प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य पुढे नेण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. त्यांनी जवळच्या संपर्कात राहण्याचे मान्य केले,” असे पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.