
ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर तळीरामांना चढय़ा भावाने विकण्यासाठी विदेशी मद्याचा मोठा साठा मुंबईत आणण्यात आला होता. विदेशातून आयात झाल्यानंतर विविध मार्गाने मुंबईत आणलेला एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचा विदेशी मद्याचा साठा विक्री होण्याआधीच राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.
मुंबईत विदेशातून आयात झालेला विदेशी मद्याचा साठा दिल्लीतून येणार आहे. अशी खबर उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्याआधारे अधीक्षक प्रसाद सुर्वे, प्रवीण कुमार तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक-2चे निरीक्षक प्रकाश काळे तसेच प्रकाश गौडा, संतोष चोपडेकर, संदीप मोरे, प्रताप खरबे आदींच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यासाठी तयारी सुरू केली. मुंबईत आलेला विदेशी मद्याचा काही साठा दाना बंदर येथील एका कार्यालयाजवळ आला असल्याचे कळताच पथकाने तेथे धडक देऊन एका टेम्पोत थर्माकॉलच्या बॉक्समध्ये सीलबंद करून ठेवलेला 261 विदेशी मद्याच्या सिलबंद बाटल्या मिळून आल्या. हे मद्य घेऊन आलेल्या नरेश नवानी आणि जिशान कुरेशी अशा दोघांना पकडले. त्यानंतर अधिक माहितीच्या आधारे वाडीबंदर येथील कल्याण स्ट्रीटवरील एमबीपीटी वाहनतळ येथे उभ्या असलेल्या दहा चाकी मालवाहू ट्रकमध्ये असलेल्या 391 सीलबंद मद्याच्या बाटल्या मिळून आल्या. त्यानंतर पथकाने या प्रकरणाशी संबंधित प्रेमजी गाला याला गोरेगाव येथून पकडले.
अशा प्रकारे ख्रिसमस व थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर तळीरामांना चढय़ा भावाने विकण्यासाठी बेकायदेशीपणे मुंबईत आणलेला विदेशी मद्याचा साठा उत्पादन शुल्क विभागाने त्याची विक्री होण्याआधीच पकडून मद्य तस्करांना मोठा दणका दिला. पथकाने तब्बल एक कोटी एक लाख 63 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल या कारवाईत जप्त केला.
























































