आशिष देशमुख यांची हकालपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून थेट राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्षांवर जाहीरपणे टीका करणारे आशिष देशमुख यांच्यावर अखेर पक्षाने कारवाईचा बडगा उगारला आहे. देशमुख यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत शिस्तपालन समितीने देशमुख यांचे सदस्यत्व निष्कासित करण्याचा निर्णय आज जाहीर केला. सहा वर्षांसाठी देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांबद्दल आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल उघडपणे टीका केली होती. या टीकेनंतर पक्षाच्या शिस्तपालन समितीने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. या नोटीसीला उत्तर देतानाही आशिष देशमुख यांनी राहुल गांधी यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. एकीकडे पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजाविल्यानंतर यासंदर्भातील कारवाई पूर्ण होईपर्यंत त्यांचे निलंबन केले होते. त्यामुळे आशिष देशमुख गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते.

काही दिवसांपूर्वीच मुंबईत शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समितीची विशेष बैठक झाली. या बैठकीत देशमुख यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात निश्चित करण्यात आले. या बैठकीत शिस्तपालन समितीचे इतर सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, उल्हास पवार आदी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने 5 मार्च 2023 रोजी पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसीला 9 एप्रिल रोजी आशिष देशमुख यांनी उत्तर दिले. या उत्तरावर समितीने चर्चा केली. देशमुख यांनी आपल्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल व जाहीर वक्तव्याबद्ल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वे या प्रकरणात लागू होतात. आशिष देशमुख यांनी केलेल्या पक्षविरोधी कारवाईची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतला.