
कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसने सोमवारी कुडाळ येथील एका पेट्रोल पंपासमोर पेट्रोल – डिझेल इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पेट्रोल-डिझेले दर कमी करण्याची मागणी करण्यात आली.
पेट्रोल – डिझेलची दरवाढ झाली असून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेनुसार कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसने पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला. शहरातील एस.एन.देसाई चौकात पेट्रोल पंपासमोर आंदोलन करण्यात आले. पेट्रोल – डिझेल दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, मोदी सरकारचा निषेध असो, केंद्र सरकारचा निषेध असो अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. पेट्रोल-डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी प्रकाश जैतापकर, विद्याप्रसाद बांदेकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, तालुका उपाध्यक्ष संतोष मुंज, तालुका सरचिटणीस पांडू खोचरे, युवक विधानसभा अध्यक्ष मंदार शिरसाट, युवक तालुकाध्यक्ष महेश म्हाडदळकर, शहराध्यक्ष चिन्मय बांदेकर, महिला तालुकाध्यक्षा सुंदर वल्ली स्वामी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून हे आंदोलन करण्यात आल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. आंदोलनादरम्यान परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.




























































