
भाजप महायुती सरकारकडून मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांची जाणीवपूर्वक दुरवस्था सुरू आहे. आरोग्य विभागाचा 7 हजार कोटी रुपयांचा निधी जातो पुठे? पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला दुर्बल बनवून पालिका रुग्णालयांच्या खासगीकरणाचा डाव सरकारकडून घातला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे.
मुंबई पालिकेच्या विलेपार्ले येथील आर. एन. कूपर रुग्णालयात योग्य सुविधा नाहीत, औषधांचा तुटवडा आहे. कर्मचारी संख्या अपुरी आहे. इतकेच नव्हे तर अस्वच्छतेमुळे रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट झाला असून, गेल्या दोन महिन्यांत सहा रुग्णांना उंदरांनी चावा घेतल्याचे धक्कादायक प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.
या भेटीनंतर वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, खासगी रुग्णालयांच्या फायद्यासाठी पालिका रुग्णालयांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नाही. पालिकेच्या रुग्णालयांचे खासगीकरण करण्याचा डाव यामागे आहे, पण आम्ही तसे होऊ देणार नाही. सार्वजनिक आरोग्य ही सरकार आणि महापालिकेची जबाबदारी आहे. त्याचे खासगीकरण आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला. यावेळी माजी आमदार अशोक जाधव, मोहसिन हैदर, सुरेशचंद्र राजहंस, जयकांत शुक्ला आदी पदाधिकारी उपस्थित होते.