
सामना ऑनलाईन । भोपाळ
मोठा गाजावाजा करीत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसने दत्तक घेतलेला 16 वर्षीय वृत्तपत्रविक्रेता कौशल शाक्य याच्यावर पुन्हा उपजीविकेसाठी रस्त्यावर वृत्तपत्रे विकण्याची वेळ आली आहे. कौशल 10 वर्षाचा असताना काँग्रेसने त्याला दत्तक घेत त्याच्या शिक्षणासह सर्व जबाबदारी स्वीकारली होती. पण मध्य प्रदेशात पुन्हा सत्ता मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाला आता आपल्या वचनाचा विसर पडला आहे. कौशल आता एका बॅगच्या दुकानात विक्रेता म्हणून काम करतो.
25 एप्रिल 2013 रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भोपाळ भेटीवर आले असता त्यांची रस्त्यावर पेपर विकणाऱ्या कौशलची भेट झाली होती. वडील आजारी, आई गृहिणी आणि मोठा भाऊ मजूर अशा कठीण अवस्थेत कौशलच्या कुटुंबाला एक वेळच्या जेवणासाठीही मोठा संघर्ष करावा लागत आहे. 6 वर्षांपूर्वी काँग्रेसने त्याला दत्तक घेतले खरे, पण आता मात्र तो पुन्हा बेसहारा झाला आहे. भाजपनेही त्याच्या शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पण तेही केवळ कागदावरच राहिले आहे.




























































