
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्नाटक दौऱ्याआधी काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी सोमवारी मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. कर्नाटकमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे भीषण संकट उभे ठाकले असताना त्याकडे केंद्र सरकार कानाडोळा करत असल्याचा आरोप केला आहे. मोदी सरकारने अद्यापपर्यंत जनतेला का मदत केलेली नाही, असा सवाल करत हल्लाबोल जयराम रमेश यांनी केला आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक येथील शिवमोग्गा येथे जनसभा घेणार आहेत. यावेळी काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. जयराम रमेश म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज कर्नाटक येथील शिवमोग्गा येथे दौरा आहे. आम्हाला आशा आहे की, ते राज्यातील काही महत्वाच्या मुद्द्यांवर बोलतील असा खोचक टोला यावेळी लगावला. जयराम रमेश म्हणाले की, कर्नाटकातील बहुतांश भागात भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. राज्यातील 236 तालुक्यांपैकी 223 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने 18,172 कोटी रुपये देण्याची विनंती केली आहे. मात्र, मोदी सरकारने आतापर्यंत कर्नाटकातील जनतेला मदत करण्यास नकार का दिला? असा सवाल केला आहे.
काँग्रेस नेते जयराम म्हणाले की, कर्नाटक सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील दुष्काळाशी संबंधित ताण कमी करण्यासाठी मनरेगा अंतर्गत कामकाजाच्या दिवसांची संख्या 100 वरून 150 पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, या योजनेअंतर्गत दुष्काळाच्या वेळी नागरिकांना याची मदत मिळणार आहे. मोदी सरकार केवळ या योजनेला मुदतवाढ मंजूर करण्यातच अपयशी ठरले आहे, तर ते त्यासाठी लागणाऱ्या निधीबाबतही असमर्थ ठरले आहे. मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या लोकांना मजुरी देण्यासाठी 1600 कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
मोदी सरकार कर्नाटकातील कामगारांना त्यांचे वेतन कधी देणार असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. ते म्हणाले की, 2023 मध्ये कार्यभार स्वीकारल्यापासून अन्न भाग्य योजनेद्वारे गरीब कुटुंबांना अतिरिक्त 5 किलो तांदूळ देण्याच्या कर्नाटक सरकारच्या प्रयत्नांना मोदी सरकारने अडथळे आणले आहेत. ते पुढे म्हणाले की शिवमोग्गा हा एक लोकसभा मतदारसंघ आहे ज्याचे प्रतिनिधित्व माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र बी वाय राघवेंद्र करतात. राजकारणातील ‘घराणेशाही’बाबत भाजपची भूमिका काय आहे, हे पंतप्रधानांनी स्पष्ट करावे.




























































