काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

काँग्रेस पक्षाचे चाणक्य, संकटमोचक असलेले ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे आज निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. पटेल यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

1 ऑक्टोबर रोजी अहमद पटेल कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. ट्विटद्वारे त्यांनीच ही माहिती दिली होती. कोरोनामुळे प्रकृती खालावल्यामुळे 15 नोव्हेंबर रोजी मेदांता रुग्णालयात दाखल केले होते. आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती आणखी खालावल्यामुळे बुधवारी पहाटे 3.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी दिली. अहमद पटेल यांच्या पार्थिवावर त्यांच्या जन्मगावी गुजरातमधील भरूच जिह्यातील पीरान येथे दफनविधी होणार आहे.

‘वन मॅन आर्मी’
अहमद पटेल यांचा जन्म 21 ऑगस्ट 1949 रोजी गुजरातमधील भरूच जिह्यात झाला. पंचायत समितीपासून राजकीय कारकीर्द सुरू करणारे अहमद पटेल यांना दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पहिल्यांदा खासदार बनण्याची संधी दिली. वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी लोकसभेचे ते खासदार बनले. तीन वेळा लोकसभा आणि पाच वेळा राज्यसभा खासदार असलेले अहमद पटेल हे राजकीय वर्तुळात अहमदभाई म्हणून ओळखले जात. राजीव गांधी यांचे संसदीय सचिव म्हणून त्यांनी काम केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे ते राजकीय सल्लागार होते. काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष होते. अहमद पटेल हे ‘वन मॅन आर्मी’ होते. काँग्रेस पक्षाच्या संकटात अनेकदा संकटमोचक म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. ते काँग्रेसचे चाणक्य होते. आठ वेळा खासदार असूनही कोणतेही सत्तेचे पद न घेता ते नेहमी काँग्रेसच्या निर्णयप्रक्रियेत राहिले.

अत्यंत चाणाक्ष बुद्धिमत्ता असलेले अहमद पटेल यांनी अनेक वर्षे जनतेची सेवा केली. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांची आठवण नेहमी राहील. अहमदभाई यांचे पुत्र फैजल यांच्याशी मी संपर्क साधला, संवेदना व्यक्त केल्या.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

ही अत्यंत दुःखद घटना आहे. आपले संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षासाठी समर्पित करणारा सहकारी आज मी गमावला आहे. अहमद पटेल निष्ठावान सहकारी, मित्र होते. काँग्रेस पक्षासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.
– सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्षा

काँग्रेसने आपला ‘चाणक्य’ गमावला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आदरांजली
अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने ‘चाणक्य’ गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवंगत ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली. पटेल हे केवळ राजकीय आघाडीवरच सक्रीय होते असे नव्हे तर अनेक सामाजिक कार्यांशी त्यांचा जवळून संबंध होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला. त्यांच्या निधनाने काँग्रेस तसेच महाविकास आघाडीने देखील आपला मार्गदर्शक गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या