आकडेवारी व बहुमतासोबत लोकभावनांचाही विचार व्हावा, धनुष्यबाण चिन्हाबाबत अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाला मिळणार? यावरून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. याबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शुक्रवारी भारत जोडो यात्रेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.

अशोक चव्हाण म्हणाले की शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचं या प्रकरणावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. मात्र धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय निष्पक्ष व्हायला हवा. ज्यांनी शिवसेना पक्ष स्थापन केला, तो पक्ष वाढवला त्यांच्या भावनाही लक्षात घेतल्या पाहिजे. आकडेवारी आणि बहुमताबरोबरच लोकांच्या भावना काय आहेत, याचाही विचार व्हायला हवा अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

यावेळी त्यांनी शिंदे गटावरही टीका केली. शिंदे सरकार आल्यानंतर अनेक विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे. हे योग्य नाही. सरकारचा दृष्टीकोन व्यापक असायला हवा. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली नसती, तर राज्य पुढे जाण्यास मदत झाली असती. त्यामुळे शिंदे सरकारला 100 दिवस झाले असले तरी या 100 दिवसांत राज्याचे प्रचंड नुकसान झाले आहे, असे ते म्हणाले.