
देशातील ज्या राज्यांत काँग्रेस पक्षाचे सरकार आहे त्या ठिकाणी बिहार राज्याप्रमाणे जातनिहाय जनगणना करण्यात येईल, अशी मोठी घोषणा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी केली. दिल्लीत काँग्रेस कार्यालयात वर्किंग कमिटीची बैठक पार पडल्यानंतर राहुल गांधी यांनी ही घोषणा केली. छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा या राज्यांत काँग्रेसचे सरकार येत आहे, असेही राहुल गांधी या वेळी म्हणाले.
दिल्लीत आज काँग्रेसची वर्किंग कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. आपल्याकडे जातनिहाय जनगणनेचा कोणताही डेटा नाही. सरकार जर त्या डेटाला समोर आणत नसेल तर त्या ठिकाणी काँग्रेसचे सरकार आल्यास आम्ही हा डेटा समोर आणू. या देशात एकूण किती लोकसंख्या आहे, कोणत्या लोकांकडे किती संपत्ती आहे, देशातील संस्थानात आदिवासी, ओबीसी, दलितांची संख्या किती आहे, हाच खरा प्रश्न आहे. परंतु पंतप्रधान म्हणतात की, विरोधक देशाला तोडत आहेत यावर तुम्ही काय म्हणाल, असे विचारताच राहुल गांधी म्हणाले, देशव्यापी जातनिहाय जनगणनेची मागणी काँग्रेसची आधीपासूनची आहे, परंतु भाजपने यावर तोंडात गुळणी धरून ठेवली आहे. ते यावर बोलायलाच तयार नाहीत.
2024 मध्ये केंद्रात सत्तेत आल्यानंतर ओबीसी महिलांची राजकीय भागीदारी सुनिश्चित करीत महिला आरक्षण लागू करण्यात येईल, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. कार्यकर्त्यांनी सावधपणे, अनुशासन आणि एकजुटीने काम करणे गरजेचे आहे, असेही खरगे यांनी म्हटले. इंडिया आघाडीच्या तीन बैठकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात इंडियाची ‘पॉवर’ दिसली आहे, असेही खरगे म्हणाले.
























































