
सामना ऑनलाईन । मुंबई
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ला होता. मुंबईत तर त्यांना एकही सीट जिंकता आली नव्हती. त्यामुळे यंदाच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चर्चेतल्या लोकांना उमेदवारी देण्यावर काँग्रेसचा भर असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत काँग्रेसकडून प्रसिद्ध अभिनेत्याला तिकीट देण्यात येणार असून त्या अभिनेत्याच्या लोकप्रियतेचा फायदा करून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

गोविंदाचा भाचा व प्रसिद्ध विनोदवीर कृष्णा अभिषेक याला काँग्रेस उत्तर मुंबईतून तिकीट देणार असल्याचे समजते. याच मतदार संघातून 2004 साली गोविंदाने देखील निवडणूक लढवली होती व तो जिंकला होता. नुकतीच कृष्णाने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची भेट घेतली. काँग्रेसमध्ये सध्या उत्तर मुंबईत उमेदवारी देण्यासाठी एकही मोठा नेता किंवा प्रसिद्ध चेहरा नसल्यामुळे काँग्रेसने आता कृष्णाला उमेदवारी देण्याचे ठरवले असल्याचे समजते.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच कृष्णाने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत तो राजकारणात हात आजमावत असल्याचे सांगितले होते. ‘माझे मामा गोविंदा यांनी लढवलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास मी इच्छुक आहे. याबाबत सध्या माझी काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे’, असे कृष्णाने मुंबई मिररला सांगितले होते.
या आधी काँग्रेसकडून करिना कपूर भोपाळमधून निवडणूक लढवणार अशा बातम्या आल्या होत्या. मात्र करिनाने, आपण बॉलीवूडमध्येच खूश आहोत असं सांगत लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र काँग्रेसकडून बॉलीवूड आणि टीव्ही वाहिन्यांमधील प्रसिद्ध चेहऱ्यांना संधी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



























































