
महाराष्ट्रात ‘गुपचूप’ सरकार स्थापन करण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या कृतीनंतर अभूतपूर्व राजकीय पेच निर्माण झाला आहे. या परिस्थितीत आपले धोरण ठरवण्यासाठी काँग्रेस संसदीय रणनीती गटाची सोमवारी नवी दिल्लीत बैठक झाली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीला काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, अधिर रंजन चौधरी आणि के. सी. वेणूगोपाल उपस्थित होते.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या आघाडीने महाराष्ट्रात बहुमताचे सरकार स्थापन करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते पण देवेंद्र फडणवीस यांनी अल्पमतातील भाजप सरकार स्थापन केल्याने महाराष्ट्रात पेच निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रात जनमताच्या अपहरणाचे युग सुरू
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपने देशाची राज्यघटना क घटनात्मक संस्थांना ठेंगा दाखकून सत्तेच्या खेळाची पुनराकृत्ती सुरू केली आहे. हे सर्व पाहिल्यावर जनमताच्या खुल्या अपहरणाच्या युगात आपण पोहचलो आहोत की काय असा प्रश्न पडतो असा टोला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपला लगावला आहे. सत्तासंघर्षावरून गेला महिनाभर महाराष्ट्रात सुरू असलेल्या घडामोडी व भाजपकडून सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर प्रियंका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली.





























































