
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये काँग्रेसकडून रविवारी वाढत्या महागाईविरोधात मेगारॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. या रॅलीत काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आम्ही कोणालाही घाबरत नाही. देशातील जनतेला कोणीही घाबरवू शकत नाही, असा विश्वास या रॅलीत व्यक्त करण्यात आला.
या देशात 2014 पासून हिंदुत्ववादी सत्तेत आहे. मात्र, हिंदू सत्तेच्या बाहेर आहेत. आपल्याला हिंदुत्ववाद्यांना हटवून हिंदूची सत्ता आणायची आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले. आम्हांला कोणीही घाबरवू शकत नाही. आम्ही मृत्यूला घाबरत नाही. हिंदुत्ववाद्यांना फक्त सत्ता हवी आहे. त्यांचा मार्ग सत्याग्रहाचा नसून सत्ताग्रहाचा आहे, असा हल्ला राहुल यांनी चढवला. देशातील जनता भगवान शंकराची उपासक आहे. भगवान शंकरासारखे आण्ही भीती गिळून टाकू. हिंदुना कसलीही भीती नसते. मात्र, हिंदुत्ववादी भीतीतच जगत असतात, असेही राहुल गांधी म्हणाले. सध्याची देशाची परिस्थिती आपण सगळे बघत आहोत. वाढती महागाई आणि बेरोजगारीमुळे जनता त्रस्त झाली आहे. सत्ता काही लोकांकडे केंद्रीत झाली आहे. देश जनता चालवत नसून काही उद्योगपती देश चालवत आहेत, असा आरोपही राहुल यांनी केला.
केंद्र सरकार जनतेचे भले कसे करता येईल, याचा विचारत करत नाही, असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या घरापासून 10 किलोमीटरवर असलेल्या शेतकरी आंदोलकांना भेटायला जात नाहीत. मात्र, जगभर फिरून येतात. हे सरकार मोजक्या उद्योगपतींसाठीच काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकारने 70 वर्षांच्या हिशोब मागण्याऐवजी सात वर्षांत त्यांनी काय केले ते सांगावे, असा सवालही केला. वाढत्या महागाईने जगणे कठीण झाले आहे. सरकार जाहिरातीवर जेवढा खर्च करते, तेवढा जनतेवर खर्च करत नाही, असेही त्यांनी सांगितले. महागाईविरोधातील लढाई आपल्या सगळ्यांची आहे, असेही त्या म्हणाले.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. नरेंद्र मोदी हे असे पंतप्रधान आहेत, जे मुख्यमंत्र्यांचा पत्रांना उत्तरे देत नाही. यावरून देश कोणत्या दिशेने जात आहे, हे समजते, असे ते म्हणाले. महागाई रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही सचिन पायलट यांनी केला. 2024 मध्ये भाजपला दिल्लीतून हचवण्याची तयारी जयपूरपासून सुरू झाली आहे, असे पायलट यांनी सांगितले. जनता महागाईने त्रस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या दबावामपुढे सरकार झुकले आहे. आता त्यांना जनतेपुढे झुकावे लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.




























































