
अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. राष्ट्रवादीत अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीप्रमाणेच काँग्रेसमधील काही आमदारही फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत आता अजित पवार गटातील आमदार आणि कबिनेट मंत्री अनिल पाटील यांनी मोठा दावा केला आहे.
काँग्रेसचे आमदार अजितदादांच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल, असे विधान नुकतेच मंत्रिपदाची शपथ घेतलेले आमदार अनिल पाटील यांनी केले आहे. जळगावमध्ये अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी काळात पुन्हा एक राजकीय भूकंप पाहायला मिळणार का हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार हे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या संपर्कात आहेत. येणाऱ्या काळात हे संपर्कातील आमदार आणि खासदार पक्षप्रवेश करतील, असे अनिल पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्यासाठीही आमचे दरवाजे खुले असल्याचे म्हणत एकप्रकारे साद घातली आहे.
View this post on Instagram
पटोले म्हणतात, काँग्रेस एकसंध!
काँग्रेस एकसंध असूनही कुणीही पक्षातून बाजूला जाणार नाही, असा ठाम दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. जाणीवपूर्वक अशी चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काही लोक गेले असले तरी त्याचा आमच्या आघाडीवर काहीही परिणाम झालेला नाही. उलट आघाडी आणखी बळकट झाली आहे, असेही ते म्हणाले.
































































