महाआघाडीचे जागावाटप ठरले; विखेंची मात्र दांडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीचे जागावाटप शनिवारी अखेर जाहीर करण्यात आले. काँग्रेस 24, राष्ट्रवादी 20 आणि मित्रपक्ष 4 जागांवर लढणार आहे. विशेष म्हणजे, ही केवळ महाआघाडी नसून 56 समविचारी पक्ष आणि संघटनांची संयुक्त पुरोगामी आघाडी असल्याचा दावा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, या संयुक्त पत्रकार परिषदेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील मात्र अनुपस्थित होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, शेकाप, रिपाइंचे कवाडे व गवई गट यांच्यासह महाआघाडीची निर्णायक बैठक शनिवारी झाली आणि त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भाजपची ‘बी टीम’

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सहा जागा सोडण्याची आमची तयारी होती असा दावा करीत अजित पवार पुढे म्हणाले की, महाआघाडी करताना सहभागी होणाऱया मित्रपक्षांना आम्ही 10 जागा सोडण्याची तयारी ठेवली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून 38 जागा लढविण्याचीही तयारी केली होती. वंचित बहुजन आघाडीला या महाआघाडीत सहभागी व्हायचे नव्हते. भाजपला मदत व्हावी म्हणून चर्चेचे गुऱहाळ त्यांनी चालविले होते काय अशीच शंका आम्हाला येते आहे. जे पक्ष आमच्या आघाडीत आले नाहीत ते भाजपची ‘बी टीम’ असल्याची टीकाही अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केली.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत आमचाही ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’मध्ये सहभाग, असे ठोकून दिले. मात्र ‘रिपब्लिकन जनशक्ती’ शिवसेनेसोबत कायम आहे, असे त्या पक्षाचे नेते, प्रख्यात दलित साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना स्पष्ट केले.

गेल्या वर्षी संविधान परिवारातर्फे काढण्यात आलेल्या संविधान यात्रेवेळी अशोक चव्हाणांशी आपली प्रासंगिक चर्चा झाली होती, पण विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसने आपल्याशी कोणतीही चर्चा कधी केलेली नाही, असे त्यांनी सांगितले.

कुणाला किती?

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 26 तर राष्ट्रवादी काँग्रेस 22 जागा लढविणार आहे. काँग्रेस आपल्या कोटय़ातून 2 जागा मित्रपक्षांना देणार आहे. त्यातील पालघरची जागा बहुजन विकास आघाडीला तर उर्वरित एक जागा राजू शेट्टींच्या स्वाभिमानीला सोडण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हातकणंगलेची एक जागा स्वाभिमानीला तर उर्वरित एक जागा रवी राणांच्या युवा स्वाभिमान पार्टीला सोडणार आहे. सांगलीतील जागेबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसच्या उर्वरित सहा जागांबाबत पक्षाध्यक्ष राहुल गांधी निर्णय घेतील, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

विख्रे-पाटील गेले कुठे…
या संयुक्त पत्रकार परिषदेला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील मात्र अनुपस्थित होते. ते भाजपचा प्रचार करीत आहेत असा प्रश्न त्यांना केला असता, ते दुसऱया कुठल्या पक्षाचा प्रचार करतील असे आम्हाला वाटत नाही. हा विषय आता संपला असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.