काँग्रेसचे मिशन ३००, मोदी सरकारची उलटी गिनती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची आज पहिली बैठक झाली. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली असून आगामी लोकसभा निवडणुकीत ३०० जागा जिंकण्याचा निर्धारही केला. काही ठिकाणी आघाडय़ा केल्या जातील, पण पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधीच असतील असे कार्यकारिणीने ठरवले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी २०१९च्या निवडणुकीतील रणनीतीबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. देशात १२ राज्यांत काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. पक्षाने आपल्या कार्यक्षमतेत तीन पट वाढ केल्यास काँग्रेस १५० जागा जिंकू शकते. तसेच इतर राज्यांमध्ये अन्य पक्षांशी आघाडी केल्यास पक्षाला आणखी १५० जागा मिळतील. अशा पद्धतीने काँग्रेस ३०० जागांवर आघाडी मिळवू शकते, असे चिदंबरम यांनी बैठकीत स्पष्ट केले.

मनमोहन सिंगांचा मोदींवर निशाणा

बैठकीत मनमोहन सिंगांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी मोदी यांची प्रशंसा आणि जुमलेबाजीच्या संस्कृतीला छेद दिला. विकासासाठी आवश्यक ठोस रणनीतीच्या हे विरुद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. २०२२पर्यंत शेतकऱ्यांची मिळकत दुप्पट करण्याचा सरकारचा दावा पूर्ण करण्यासाठी कृषी क्षेत्राच्या विकास दरात वृद्धी होण्याची गरज आहे. परंतु हे कुठेच दिसत नसल्याचे मनमोहन सिंग म्हणाले.

निवडणूक अभियान समिती निवडण्याचा अधिकार राहुल गांधींना

निवडणूक अभियानासाठी समिती निवडण्याचा अधिकार राहुल गांधी यांनाच देण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत झाल्याची माहिती काँग्रेसचे महासचिव अशोक गहलोत यांनी दिली. याशिवाय निवडणुकीआधी आघाडीबाबतही अंतिम निर्णय राहुल हेच घेणार आहेत.

> लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱया या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी आणि दिग्विजय गैरहजर राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत असून या दोघांनाही बैठकीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण होते.

मोदी सरकारची उलटी गिनती

मोदी यांच्या भाषणशैलीतून नैराश्य स्पष्टपणे दिसत असून मोदी सरकारची उलटी गिनती सुरू झाल्याचेच हे द्योतक असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.

ही मोठी लढाई; वाचाळ नेत्यांविरोधात कडक कारवाई करणार

माझ्यासाठी २०१९ची लोकसभा निवडणूक ही मोठी लढाई असून पक्षाच्या व्यासपीठावर प्रत्येकाला बोलण्याचा हक्क आहे. परंतु जर कुणी नेत्याने वाचाळपणा करत बिनडोकपणे विधाने केली आणि ही लढाई कमजोर झाली तर त्या नेत्याच्या विरोधात कडक कारवाई करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सर्वांना इशारा दिला.