
पाकिस्तानचा विषय निघाला की आपले राज्यकर्ते चवताळून उठतात. सरकारही आक्रमक पवित्रा घेते, मात्र चीनचा विषय निघाला की आपले सरकार थंड पडते असे का, असा सवाल करत काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी बुधवारी लोकसभेत सरकारवर हल्लाबोल केला.
अंदमान व निकोबारपर्यंत जहाज पाठवेपर्यंत चीनची मजल गेली आहे. पाकिस्तानने चुळबूळ केली की सरकार सतर्क होते. अर्थात, सरकारने ही सतर्कता दाखवायलाच हवी, मात्र ही सतर्कता चीनच्या बाबतीत आपले सरकार का दाखवत नाही? चीनच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
चीनबरोबर वास्तविक नियंत्रण रेषेबाबत सहमती नाही – राजनाथ सिंह
हिंदुस्थान व चीनमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेबाबत (एलसी) अजून सहमती झालेली नाही. कधी कधी चीनची घुसखोरी होते तर कधी कधी आपले सैन्यही तिकडे जाते, मात्र देशाची अस्मिता आणि एकात्मतेशी सरकार तडजोड करणार नाही. त्यामुळेच सीमावर्ती भागामध्ये मोठय़ा प्रमाणात विकासकामे सुरू असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तरादाखल सांगितले.
























































