राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा पोहचण्यापूर्वी जम्मूत दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट! 9 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहशतवाद्यांनी केलेल्या दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी जम्मू हादरले. या स्फोटात नऊ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सोमवारी (दि. 23) जम्मू येथे पोहचणार आहे. मात्र, दोन दिवस आधी बॉम्बस्फोट झाले. यामुळे खळबळ उडाली असून, बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारीहून निघालेल्या राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा समारोप 30 जानेवारीला श्रीनगर येथे होणार आहे. ‘भारत जोडो’ यात्रेचे गुरूवारी पंजाबमार्गे जम्मू-काश्मिरात कथुआ जिल्हय़ात आगमन झाले. ही यात्रा आता सांबा जिल्हय़ात विजयनगर येथे आहे. शनिवारी विश्रांती केल्यानंतर सोमवारी यात्रा जम्मुत दाखल होईल. ‘भारत जोडो’ यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जम्मू-काश्मीरात पोलीस बंदोबस्तही वाढविला असताना आज बॉम्बस्फोटांनी जम्मू हादरले.

अर्ध्या तासांत दोन स्फोट

जम्मूतील नारवाल परिसरात ट्रान्सपोर्ट नगर येथे पार्किंग केलेल्या एका जुन्या बोलेरो गाडीत सकाळी अकरा वाजता मोठा बॉम्बस्फोट झाला. दहशतवाद्यांनी बोलेरोमध्ये आयईडी स्फोटकांनी हा धमाका केल्याचा अंदाज आहे. स्फोटामुळे या ठिकाणी असलेले पाच नागरिक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश शर्मा यांनी सांगितले.

या स्फोटानंतर 50 मिटर अंतरावर सकाळी साडेअकरा वाजता दुसरा धमाका झाला. यात चारजण जखमी झाले. जखमींच्या हाता-पायांना जखमा झाल्या आहे.

बंदोबस्त वाढविला

दहशतवाद्यांनी केलेल्या दोन बॉम्बस्फोटांनी जम्मु-काश्मिर हादरले आहे. पोलिसांनी जम्मु आणि परिसरात नाकाबंदी केली आहे. पोलीस आणि लष्करी बंदोबस्त मोठय़ा प्रमाणावर वाढविला आहे.