
देशातील काँग्रेसचे नेतृत्व पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याकडे सोपविण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी पक्षाला आता आपला मार्ग शोधायला हवा. काँग्रेसचा अध्यक्ष हा गांधी घराण्याबाहेरील असावा अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष असावा अशी मागणी मागील काही महिन्यांपासून पक्षांतर्गत वर्तुळात जोर धरू लागली आहे. राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व सोपविण्यात यावे, असा आग्रह पक्षाच्या विविध बैठकांमध्ये धरला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी एका पुस्तकाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या कुटुंबातील कोणाकडेही काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा असू नये असं राहुल गांधी यांनी सांगितलं होतं. या मताशी मी पूर्णतः सहमत आहे. गांधी कुटुंबीयांशिवाय कुणीही व्यक्ती अध्यक्ष झाल्यास त्यांच्यासोबत काम करण्यास अडचण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलें.
खरंच कुटुंबाबाहेर अध्यक्षपद जाईल?
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत पक्षाचं अध्यक्षपद गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे सोपविण्यात यावं असं मत मांडलं होतं, परंतु यावर कुठलाही तोडगा निघाला नाही. काही महिने हे पद रिक्त राहिलं आणि कालांतराने सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामुळे खरंच काँग्रेसचं अध्यक्षपद गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे जाईल का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सोशल मीडियाला काँग्रेसला समजण्यास उशीर
भाजपविरोधी विचारांच्या लढाईत काँग्रेस पराभूत झालीय का? या प्रश्नावर उत्तर देताना प्रियंका गांधी म्हणाल्या, मला काटतंय काँग्रेसने सोशल मीडियाला समजण्यास उशीर केला. पक्षाने या माध्यमाचा वापर करून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली, तोपर्यंत खूप नुकसान झाले होते.


























































