डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकावर, आर्थिक धोरणांवरून काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची केंद्रावर टीका

डॉलरच्या तुलनेत हिंदुस्थानी रुपया आज पुन्हा ऐतिहासिक नीचांकावर घसरला असून रुपया प्रति डॉलर 90 रुपयांच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर आर्थिक व्यवस्थापनाबद्दल जोरदार टीका केली. संसद भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना खरगे म्हणाले की, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे रुपयाची घसरण होत असून या परिस्थितीत हिंदुस्थानी चलनाची जागतिक स्तरावर किंमत उरलेली नाही.

“रुपया का घसरतोय? कारण त्यांची आर्थिक धोरणं चुकीची आहेत. धोरणे योग्य असती तर हिंदुस्थानी रुपया मजबूत झाला असता. देशाची आर्थिक स्थिती चांगली आहे असं सरकार सांगतं, पण रुपया काय स्थितीत आहे तेच सत्य दाखवतं,” असे खरगे म्हणाले.

अलीकडेच परकीय गुंतवणुकीचा ओघ मंदावला आहे, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि हिंदुस्थान–अमेरिका व्यापार चर्चेबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने रुपयावर दबाव वाढल्याचे आर्थिक तज्ज्ञ सांगत आहेत.

2025 मध्ये हिंदुस्थानीय रुपया आशियातील सर्वात कमजोर चलनांपैकी एक ठरला असून वर्षभरात त्यात सुमारे 4-5 टक्के घसरण झाली आहे. गुरुवारी सकाळी व्यापारात डॉलरच्या तुलनेत रुपया 90.20 ते 90.33 या पातळीवर होता.

दरम्यान, काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनीही या मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधला. त्यांनी आठवण करून दिली की, 2013 मध्ये रुपया घसरताना भाजपने तत्कालीन UPA सरकारची खिल्ली उडवली होती. त्या वेळी भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी रुपयाच्या घसरणीवर टोमणा मारत ते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या वयाशी तुलना केली होती. आता रुपया 90 रुपयांवर पोहोचल्याने विरोधकांनी सरकारला स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.