मतचोरीविरोधात काँग्रेसचा दादरमध्ये चक्का जाम, राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा

भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने महाराष्ट्रात मतचोरी कशी केली हे काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी समोर आणल्यानंतर भाजपसह आयोगाचेही धाबे दणाणले आहेत. राहुल गांधी यांच्या आरोपांबद्दल खुलासा करण्याऐवजी त्यांनाच प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आले. त्याविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी दादरमध्ये रास्ता रोको आंदोलन करून भाजप आणि निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. दादरमध्ये चक्का जाम करून निवडणूक आयोग आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘चौकीदार ही वोट चोर है’ अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच मतचोरींच्या आकड्यांचे फलक झळकावण्यात आले. या आंदोलनात प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, राजन भोसले, किशोर कन्हेरे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, अनंत गाडगीळ आदी पदाधिकाऱयांसह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

मतचोरीविरोधात प्रदेश काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे. रॅली, पदयात्रा व यात्रा अशा विविध प्रकारे हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

‘चीप मिनिस्टर’ फडणवीस निवडणूक आयोगाचे दलाल की वकील? – सपकाळ

निवडणूक आयोगाची पोलखोल केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली त्यातून ते निवडणूक आयोगाचे दलाल आहेत, वकील आहेत की प्रवत्ते असा प्रश्न पडतो, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. फडणवीस यांच्यातील अहंकाराची दुर्गंधी त्यांच्या बोलण्यातून दिसली. ते ‘चीफ मिनिस्टर’ नाहीत, तर ‘चीप मिनिस्टर’ आहेत असा टोलाही सपकाळ यांनी लगावला.