आजारी आजीला भेटण्यासाठी राहुल गांधी सुट्टीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँगेसच्या स्थापना दिनानिमित्तच्या कार्यक्रमालाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र काँग्रेसतर्फे त्यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. इटलीमध्ये आजारी असलेल्या आजीला भेटण्यासाठी राहुल गांधी छोटय़ा सुट्टीसाठी गेल्याचे काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले.

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या स्थापना दिनालाच राहुल गांधी अनुपस्थित असल्याचा मुद्दा भाजपाकडून उचलण्यात आला होता. यानिमित्ताने राहुल यांची खिल्ली उडविण्याची संधी भाजपाला आयतीच लाभली होती.

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी तर राहुल गांधी हिंदुस्थानातील सुट्टी संपवून दुसऱ्या सुट्टीसाठी बाहेर गेले आहेत, अशी बोचरी टीका केली होती. सोशल मीडियावरही राहुल गांधींना ट्रोल केले जात होते, या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राहुल यांच्या अनुपस्थितीबाबत खुलासा केला.

इटलीमध्ये आजारी असलेल्या आपल्या आजीला भेटण्यासाठी राहुल गांधी छोटय़ा सुट्टीवर गेले आहेत, असे काँगेसचे खासदार राजीव सातव यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.