काँग्रेस सेवा दलाच्या पुस्तकातून सावरकरांची बदनामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस सेवा दलाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करण्यात आली आहे. या पुस्तकावर महाराष्ट्रात तातडीने बंदी घालावी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका कार्यक्रमात काँग्रेस सेवा दलाच्या कार्यक्रमात सावरकरांसंदर्भातील पुस्तक वाटप करण्यात आले. यामध्ये सावरकरांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रकरणी भादंवि कलम 120, 500, 503, 504, 505 आणि 506 अन्वये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रणजीत सावरकर यांनी केली आहे.

काँग्रेसकडून सावरकरांची बदनामी झाल्याचे उघड होताच देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून सर्वत्र याचा निषेध व्यक्त केला जात आहे. भोपाळमध्ये जे घडले ते महाराष्ट्रात खपवून घेणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी जे साकरकरांना शिवीगाळ करतात त्यांचे आदर्श जीना आहेत अशा शब्दांत काँग्रेसवर निशाणा साधला.

काँग्रेसचे मानसिक संतुलन बिघडले -उमा भारती

तो दिवस दूर नाही जेव्हा गांधी पुटुंब, जय श्री राम आणि भारत माता की जय बोलेल. महापुरुषांचा अपमान करणे ही काँग्रेसची सवय आहे. काँग्रेस नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे अशा शब्दांत भाजप नेत्या उमा भारती यांनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला.

भोपाळची घाण महाराष्ट्रात येऊ देणार नाही – संजय राऊत

हे पुस्तक बेकायदेशीर आहे. त्यावर बंदी आहे तरीही अशी पुस्तके वाटली जातात. भाजप नेत्यांबाबतची पुस्तकेही वाटली गेली आहेत. आम्ही महाराष्ट्रात हे पुस्तक खपवून घेणार नाही. भोपाळची घाण महाराष्ट्रात येऊ देणार नाही. सावरकर आमच्यासाठी महान होते, आहेत आणि राहतील. त्यांच्यावरची आमची श्रद्धा अशा प्रकारच्या फालतू पुस्तकाने कमी होणार नाही अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला सुनावले.