परिचारक, दानवे, राम कदम व छिंदम यांची काय घसरली होती?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

जवान सीमेवर देशाचे रक्षण करतात मात्र त्यांच्या पत्नींना येथे मुले कशी होतात असे विधान करुन वीर जवानांना अपमानित करणारे भाजपचे आमदार प्रशांत परिचारीक, शेतकर्‍यांना साल्यांनो म्हणणारे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुलींना पळवा म्हणणारे आमदार राम कदम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी शिवराळ भाषा वापरणारे छिंदम यांची जीभ नव्हे तर काय घसरली होती? असा सवाल करत नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमदारांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांचा चांगलाच समाचार घेतला. पात्रता नसतांना केवळ काँग्रेसच्या जीवावर मोठे झालेल्या बांडगुळांना बेताल वक्तव्य करण्याचा अधिकारच काय आहे असा सवाल माजी पालकमंत्री आ.डी.पी.सावंत, काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर व नायगावचे आमदार वसंतराव चव्हाण यांनी येथे केला.

भाजपाने नांदेडमध्ये केलेले आंदोलन ही एक नौटंकी आहे. काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसच्याच झाडावर फुकट वाढलेल्या ह्या वेली आहेत. यांचे स्वतःचे कोणतेच अस्तित्त्व नाही. केवळ राज्याचे नेते खासदार अशोकराव चव्हाण यांच्या विषयी अभद्र बोलून भाजपाश्रेष्ठींकडे स्वतःचे अस्तित्त्व दाखविण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर यांनी गोदावरी मनार कारखान्यासह खानापूरची सुत गिरणी खाऊन टाकली. आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी कलंबरचे दिवाळे काढले. या दोघांनी बोगस कर्जे काढून जिल्हा बँक दिवाळखोरीत काढण्याचे पाप केले. त्यांना या जिल्ह्यातील जनता चांगलीच ओळखून आहे. त्यामुळेच महापालिका निवडणूकसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पळता भुई कमी करुन सोडले आहे. ज्या बिलोली, देगलूर विधानसभा मतदार संघात भास्करराव पाटील राजकारण करतात तेथील बिलोली आणि देगलूर नगरपालिका व देगलूर पंचायत समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता आणून जनतेनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. तर प्रताप पाटील चिखलीकर यांना लोहा आणि कंधार नगरपालिकेसह कंधार पंचायत समितीतून सुद्धा जनतेनी हद्दपार केली आहे. तरीही तोंड वर करुन काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करण्याची भाषा ते करतात. याचे आपणास नवल वाटत असल्याचे सांगतानाच भास्करराव पाटील खतगावकर यांनी जिल्ह्यातील जनतेची किती आर्थिक लूट केली आहे हे आधी सांगावे.

भाजपच्या राज्यपातळीवरील नेत्यांनी केलेले बेताल वक्तव्य आजही महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. हिंदुस्थानी जवान सिमेवर लढत असताना त्यांच्या पत्नीना मुले होतातच कशी असा निर्लज्ज सवाल भाजपचे आमदार प्रशांत परिचारीक यांनी केला होता. तर ज्या शेतकर्‍यांच्या जीवावर सत्तेत भाजप आली त्यांनाच साल्यांनो म्हणण्याची हिम्मत खा.रावसाहेब दानवे यांनी दाखविलीच कशी असा सवाल करतानाच मुलींना पळवून न्या मी तुमच्या सोबतच आहे. असे म्हणणारे आ.राम कदम असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शिवराळ भाषा वापरणारे नगरचे माजी उपमहापौर छिंदम असतील ही सगळी पिल्लावळं भाजपमधीलच आहेत. त्यांना सभ्यतेचा अर्थ कळतो का? असा प्रश्‍न आम्हाला पडला आहे. महाराष्ट्रातील जनता या सगळ्या नेत्यांना व त्यांच्या विधानांना विसरली नाही. जनसंघर्ष यात्रेदरम्यान खा.अशोकराव चव्हाण व काँग्रेस नेत्यांच्या सभांना अलोट गर्दी लोटत आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यांना आगामी 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभव डोळ्यापुढे दिसत आहे. म्हणूनच खा.अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या विधानाचे राजकारण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मुळात खा.अशोकराव चव्हाण यांची भाषा ही नेहमीच सभ्यतेला धरुन असते. त्यामुळे वाचाळविरांचा पक्ष म्हणून प्रसिध्द असलेल्या भाजपचे पदाधिकारी असली नौटंकी करत आहेत असेही आ.डी.पी.सावंत, आ.अमरनाथ राजूरकर, आ.वसंतराव चव्हाण यांनी म्हटले आहे.