
सलग तीन सुट्ट्या आल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदार बाहेरगावी गेले असून ठाण्यात दीड लाख मतदारांच्या घरांना कुलूप असल्याचे समोर आले आहे. याचा फटका मतदानाच्या टक्केवारीला बसल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान कुलूप बंद असलेल्या मतदारांना फोनाफोनी करून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. तर काही मतदारांकडून निवडणुकीच्या दिवशी आम्ही हजर राहणार आहोत, असे आश्वासन दिले असल्याचे जिल्हा प्रशासनाने यावेळी सांगितले.
शिवसेनेशी गद्दारी झाल्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. अतिशय चुरशीची निवडणूक असलेल्या या मतदारसंघात 25 लाखांपेक्षा अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी जवळपास दीड लाख मतदार हे आपल्या गावी तसेच बाहेर फिरायला गेले असल्यामुळे या मतदारसंघात काही प्रमाणात मतदान कमी होण्याची चिन्हे आहेत. घरोघरी मतदार स्लिप वाटताना जवळपास 10 टक्के घरे बंद असल्याचे समोर आले असून यातील बहुतांश मतदार हे गावी गेल्याचे आजूबाजूला चौकशी केल्यानंतर उघड झाले आहे.



























































