
असं म्हणतात की चांगल्या आरोग्यासाठी चांगली पचनशक्ती गरजेची असते. आपण जे खातो पितो, त्यातूनच आपल्याला शक्ती मिळते. त्यामुळे पचन यंत्रणा नीट ठेवणं गरजेचं असतं. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपल्याला बद्धकोष्ठ, मूळव्याध, अपचन, गॅसेस असे त्रास वारंवार होऊ शकतात. यात विशेषतः अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. अशा व्यक्ती आहारात काही पदार्थांचा समावेश करून पोटाचे आरोग्य निरोगी राखू शकतात.
धान्याचा कोंडा
अनेकदा मिळणारी तृणधान्य ही पॉलिश्ड असतात किंवा त्याचं पीठ काढताना कोंडा बाजूला पडतो. पण हा कोंडा बाजूला न टाकता संपूर्ण धान्याच्या पिठापासून बनलेल्या भाकऱ्या या सेवन करणं कधीही उत्तम असतं. कारण कोंडा हा तंतुमय असतो. आपलं आतडं तंतुमय पदार्थ पचवू शकत नाही. मात्र, तंतुमय पदार्थ शरीरातून बाहेर पडताना पोटातील मैद्यासारखे जड पदार्थ सहज बाहेर काढतात.
सफरचंद
सफरचंदातही पेक्टिन नावाचा तंतू असतो. तो आपल्या आतड्यांसाठी खूप चांगला असतो. आपल्या आतड्यांतील फॅटो अॅसिडचा स्तर वाढवून अन्नपचनाला मदत करतो
अननस
अननसात ब्रामेलाईन नावाचा एक विशिष्ट घटक असतो. हा घटक प्रथिने पचवण्यासाठी खूप चांगला असतो. कारण, बऱ्याचदा एक हेल्दी पर्याय म्हणून प्रथिनांचे सेवन केले जाते. पण, शरीर त्यांना सहज पचवू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही हायप्रोटीन डाएटवर असाल तर अननस खाणं तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं.
केळे
केळं हा तंतु आणि पोटॅशिअमचा खूप मोठा स्रोत आहे. केळ्यात एमिलेज आणि माल्टेजसारखे अनेक घटक असतात, जे पोटातील पचण्यास कठीण असलेल्या कर्बोदकांच्या पचनासाठी मदत करता. जर जेवल्यानंतर एक तासाने तुम्ही एक किंवा दोन केळी खाल्लीत तर तुमचं जेवण सहज पचू शकतं.
पपई
उष्ण मानलं गेलेल्या पपई या फळात पपाईन नावाचा एक घटक असतो. हा घटक प्रथिने पचवण्यासाठी उपयुक्त असतो. त्याखेरीज पपईत अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात, जे अनेक घातक रोगांपासून तुमचं रक्षण करतात.
आले
चहात किंवा काढ्यात वापरलं जाणारं आलं हा एक उत्तम घटक आहे. आपल्या खाण्यात आल्याचा समावेश करणं शरीराला लाभदायक असतं. आल्यात जिंजिबाईन नावाचा एक घटक असतो, तो प्रथिने पचवण्यास सहाय्यभूत ठरतो. तसंच आल्यामुळे सर्दी, कफ असे त्रासही दूर होतात.



























































