ब्रिटिशकालीन कर्नाक पुलाचे बांधकाम नोव्हेंबरपासून; 41.27 कोटींचा खर्च, मे 2024 पर्यंत काम पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजपासून परिसरातील बांधकामे हटवणार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद बंदरदरम्यान असणारा 154 वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन पुलाचे नोव्हेंबरपासून बांधकाम केले जाणार आहे. यासाठी 22 ऑगस्टपासून या पुलाच्या परिसरातील बांधकामे हटवण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. या पुलाच्या बांधकामासाठी 41.27 कोटींचा खर्च केला जाणार असून मे 2024 पर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.   

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद बंदरदरम्यान कर्नाक हा महत्त्वाचा पूल आहे. दक्षिण मुंबईतील मस्जिद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मोहमद अली रोड परिसरातील व्यापाऱयांना वाहतुकीसाठी हा पूल महत्त्वपूर्ण आहे, मात्र या ऐतिहासिक पुलाची मोठय़ा प्रमाणात झीज झाली आहे. त्यामुळे हा पूल नोव्हेंबर 2013 पासून अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदही करण्यात आला आहे. 2018 मध्ये ‘आयआयटी’ने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल आल्याने पालिकेने हा पूल नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

चेंबूरमध्ये पर्यायी घरे

हा पूल वाहनांसाठी पूर्णपणे बंद झाल्यानंतर 50 टक्के वाहतूक मस्जिद बंदर येथील युसूफ मेहर अली रस्त्यावरून वळविण्यात येणार आहे. त्यामुळे दाणाबंदरच्या दिशेने जाणाऱया पदपथावरील 27 झोपडय़ा पाडाव्या लागणार आहेत.

पात्र झोपडपट्टीधारकांना चेंबूरमध्ये पर्यायी घरे देण्यात आली आहेत. या पुलाच्या बांधकामासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या चौक्या, दोन सार्वजनिक शौचालये, बेस्टचे वीज सबस्टेशन पाडण्यात येणार आहे. 22 ते 25 ऑगस्टदरम्यान हे काम चालणार आहे.