
सामना प्रतिनिधी । परभणी
संपूर्ण मराठवाड्यासाठी मंजुरी मिळालेल्या जय भवानी महिला सहकारी सुतगिरणीच्या बांधकामास प्रारंभ होणार असल्याची माहिती शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
परभणी येथून जवळच असलेल्या एरंडेश्वर शिवारात बांधकामास लवकर सुरुवात करणार असल्याची माहिती देत संबंधीत सुतगिरणीच्या प्रकल्प अहवालास राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने ही मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात गुरुवार, ४ जुलै रोजी राज्य शासनाने अध्यादेशही काढला आहे. जय भवानी महिला सहकारी सुतगिरणी या सर्वसाधारण प्रवर्गातील सुतगिरणीची २ नोव्हेंबर२०१८ रोजी महाराष्ट्र शासनाने अर्थसहाय्यासाठी निवड केली आहे.
राज्यातील सहकारी सुतगिरण्यांच्या प्रकल्प अहवालाची सुधारीत किंमत ३७४.२४ लाख इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार महिला सहकारी सुतगिरणीने महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मुंबई यांच्याकडून २५,२०० रुपयांचा व त्यांच्या १०:३०:६० या आकृतीबंधानुसार प्रकल्प अहवाल तयार करुन घेतला होता. हा अहवाल वस्त्रोद्योग आयुक्तालयांकडून १४ डिसेंबर २०१८ रोजी सुकाणू समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. हा सुकाणू समितीच्या २४ जानेवारी २०१९ च्या झालेल्या बैठकीमध्ये जय भवानी महिला सहकारी सुतगिरणीच्या प्रकल्प अहवालात दर्शविलेल्या किंमतीबाबत चर्चा होऊन या सुतगिरणीच्या आकृतीबंधानुसार असलेल्या प्रकल्प अहवालाची ६१७४.२४ लाखांची किंमत समितीने मान्य केली आहे. त्यानुसार ४ जुलै रोजी राज्य शासनाने महिला सुतगिरणीच्या अहवालास मंजुरी देत असल्याचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्याबद्दल शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचे आभार मानले आहेत.


























































