
बांधकाम क्षेत्रात मराठी उद्योजकांची होत असलेली पीछेहाट रोखण्यासाठी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देश-विदेशातील बांधकाम क्षेत्रातील मराठी उद्योजकांना एकत्रित आणण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम नव्याने स्थापन झालेल्या ‘मराठी बांधकाम उद्योजक महासंघ’ने घेतला आहे. यासाठी 21 मार्च 2021 रोजी रवींद्र नाटय़ मंदिर येथे महासंघाचे पहिले महाअधिवेशन होणार असून या अधिवेशनात महासंघ आपली रूपरेषा जाहीर करणार आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारमधील मान्यवर मंत्री उपस्थित राहतील, अशी माहिती महासंघाचे सचिव विवेक सुपल यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून प्रत्येक उद्योगक्षेत्रात मागे राहिलेला मराठी माणूस आता हळूहळू उद्योग व्यवसायकडे वळू लागला आहे. परंतु उद्योग क्षेत्रात मराठी माणसाची लॉबी नसल्याने गुणवत्ता असूनही मराठी माणूस मागे राहिला. विशेषतः बांधकाम क्षेत्रात मराठी माणसांची प्रचंड पीछेहाट झाली. यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, संभाजीनगर, नाशिक यांसारख्या शहरांत आणि कोकण भागात मराठी माणसांच्या जमिनी असूनही तो बांधकाम क्षेत्रात उतरू शकला नाही. मराठी माणसांची झालेली ही पीछेहाट रोखण्यासाठीच बांधकाम क्षेत्रातील काही मराठी उद्योजकांनी एकत्रित येऊन महासंघाची स्थापना केली आहे. आणि या महासंघाच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील मराठी उद्योजकांना ताकत देण्याचे ठरविले आहे.
बांधकाम क्षेत्रात उद्योग करीत असलेल्या बांधकाम विकासक, ठेकेदार, बांधकामासंबंधित आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनीयर, स्ट्रक्चरल इंजिनीयर इथपासून पडद्यामागे असलेल्या बांधकाम क्षेत्रातील सुपर वायझर, सुतार-कारपेंटर-प्लंबर यांच्यासह बांधकाम उद्योजक क्षेत्राशी संबंधित वकील, सीए, कंपनी सेक्रेटरी, सहकार्य गृहनिर्माण संकुलातील लिपिक-व्यवस्थापक, झाडूवाला इतर बांधकाम क्षेत्राशी संबंधित सर्वच मंडळी या सर्वांच्या व्यवसायाला चालना मिळावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. म्हणूनच या सर्व घटकांना महासंघात सामील करून घेतले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभागृहाची मर्यादा लक्षात घेऊन जे उद्योजक 28 फेब्रुवारीपूर्वी नोंदणी करतील अशा उद्योजकांना या महाअधिवेशनात प्रवेश घेणे शक्य होईल. ज्या उद्योजकांना नोंदणी करावयाची असल्यास महासंघाचे सचिव विवेक सुपल यांच्या दूरध्वनी क्रमांक 9920207191 आणि 8369015182 यावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
























































