
कोरोना महामारीमुळे देशातील मालवाहतुकीला मोठय़ा प्रमाणात झळ बसल्याचे उघडकीस आले आहे. सप्टेंबरमध्ये देशातील 12 मोठय़ा बंदरांवर सलग सहाव्या महिन्यात मालवाहतुकीत सातत्याने घट होत असून इंडियन पोर्ट असोसिएशन (आयपीए) च्या म्हणण्यानुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत मालवाहतुकीत 14 टक्क्यांची घट झाली आहे. या कालावधीत एकूण 298.55 दशलक्ष टन मालवाहतूक झाली आहे. गेल्या एक वर्षापूर्वी याच काळात मालवाहतूक 348.23 दशलक्ष टन एवढी झाली होती.
गेल्या महिन्यात जहाजबांधणी मंत्री मनसुख मंडाविया म्हणाले होते की, मार्चपासून देशातील 12 प्रमुख बंदरांवर मालवाहतूक सातत्याने कमी होत आहे. ‘आईपीए’च्या म्हणण्यानुसार सर्व प्रमुख बंदरांवरील मालवाहतुकीची वाढ नकारात्मक राहिली आहे. कामराजार बंदरात एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान मालवाहतुकीत 31.63 टक्के घट झाली. त्याच वेळी चेन्नई, कोचीन आणि जेएनपीटीत 20 टक्के तर कोलकाता व मुंबई बंदरात 15 टक्क्याहून अधिक घट झाली.
देशातील 12 बंदरे 61 टक्के मालवाहतूक हाताळतात
देशातील 12 प्रमुख बंदरामंध्ये दीनदयाळ (जुने नाव कांडला), मुंबई, जेएनपीटी, मार्मागोवा, न्यू मंगळुरू, कोची, चेन्नई, कामराजार (जुने नाव एन्नोर), वीओ चिंदबरनार, विशाखापट्टणम, पारादीप आणि कोलकाता (हल्दियासह) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. या 12 मोठय़ा बंदरांवर देशातील जवळपास 61 टक्के मालवाहतूक हाताळण्यात येते.
कंटेनर, कोळसा, पेट्रोलियम, तेल आणि वंगण उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट
या बंदरामधून सन 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 70.5 दशलक्ष टन मालवाहतूक करण्यात आली. कार्गो रहदारीत कंटेनर माल, कोळसा, खते, पेट्रोलियम उत्पादने आणि इतर विभागांचा समावेश आहे. कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कंटेनर, कोळसा आणि पोल (पेट्रोलियम, ऑइल आणि वंगण) हाताळणीत मोठी घट झाली आहे.
कंटेनर विभागातील संपूर्ण व्यवसाय वर्षात 12.15 टक्के घट अपेक्षित
संपूर्ण मालवाहू विभागावर याचा परिणाम होईल. त्यातल्या त्यात कंटेनर विभागाला याची मोठी झळ बसेल असे रेटिंग एजन्सी इक्राकडून यापूर्वी सांगण्यात आले होते. संपूर्ण व्यवसाय 2020-21 मध्ये संपूर्ण मालवाहू विभाग 5-8 टक्क्यांनी कमी होऊ शकेल. या आर्थिक वर्षात कंटेनर विभागात 12-15 टक्क्यांनी घट होऊ शकते असेही नमूद करण्यात आले आहे.


























































