मेट्रोतील कामगारांची ठेकेदाराकडून पिळवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेट्रोच्या नऊ प्रकल्पांतील कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसने केली आहे. यासंबंधी वारंवार पाठपुरावा करूनही ठेकेदार जे. कुमार इफ्रा प्रोजेक्ट्स ही कंपनी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. कामगारांना कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवून त्यांची पिळवणूक केली जात आहे, असा आरोप असंघटित कामगार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (माथाडी समन्वयक) नवनाथ पवार यांनी केला आहे.

यासंदर्भात एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱयांना पत्र लिहून कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. एमएमआरडीएने जे. कुमार इफ्रा प्रोजेक्ट्सला मेट्रोच्या नऊ प्रकल्पांचे कंत्राट दिले आहे. या प्रकल्पांवर काम करीत असलेल्या जवळपास 425 कामगारांना  इन्शुरन्स, मेडिकल, पीएफ व ईएसआयसी आदी सुविधांसह किमान वेतनाप्रमाणे पगार द्यावा, तसेच कामगारांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी करावी, अशी मागणी असंघटित कामगार काँग्रेसने केली आहे.

कामगारांना सुविधा देण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ
जे. कुमार इफ्रा प्रोजेक्ट्स कंपनीने जाणीवपूर्वक एकाही कामगाराला कायदेशीर हक्कांचा लाभ दिलेला नाही. या माध्यमातून कंपनी दर महिन्याला स्वतःचे लाखो रुपये वाचवत आहे. 15 डिसेंबरला एका कामगाराचा मृत्यू झाला. विमा काढलेला नसल्यामुळे त्याला काहीच मोबदला दिला नाही, याकडेही काँग्रेसने लक्ष वेधले आहे.