
जलजीवन मिशनची कामे हर्षल पाटील आणि त्यांचे बंधू अक्षय पाटील यांनीच केली होती. तांदूळवाडीत जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या कामांच्या ठिकाणी लावलेल्या भूमिपूजनाच्या फलकांवर ठेकेदार म्हणून हर्षल आणि अक्षय पाटील या बंधूंचीच नावे आहेत. त्यांनी ती कामेही शंभर टक्के पूर्ण केली आहेत. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने त्या फलकाची छायाचित्रे तसेच जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या कामांची यादीच समोर आणली आहे.
सरकारनेच कंत्राटदार हर्षल पाटील यांचा बळी घेतल्याचा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा संघटनेने केला होता. तो अत्यंत खरा असल्याचे संघटनेचे नेते मिलिंद भोसले यांनी म्हटले आहे. एक सुशिक्षित बेरोजगार तरुण अभियंता गेला, पण त्याचे दुःख किंवा खंत सरकार आणि मंत्र्यांना नाही. पण काळ माफ करणार नाही. आता सत्ता आहे म्हणून काहीही दावे प्रतिदावे कराल, पण गेलेला आत्मा या सर्व प्रक्रियेमध्ये जाऊन हा पराकोटीचा निर्णय त्याने घेतला आहे, असा संताप भोसले यांनी व्यक्त केला आहे.