उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवा..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा धक्का, मूत्रपिंड निकामी होणे किंवा स्मृतिभ्रंश होण्याचा धोका होऊ शकतो. जर तुमचा रक्तदाब १४०/९० किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असू शकतो. या पाच गोष्टींवर जर तुम्ही लक्ष दिलेत तर रक्तदाबावर नक्कीच नियंत्रण ठेवता येईल.
ड जीवनसत्व – याची कमतरता उच्च रक्तदाबाचा धोका वाढवण्याचे काम करते. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतातच शिवाय याचा हृदयाच्या आरोग्याशीही संबंध आहे.
निद्रानाश – निद्रानाशामुळे रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीत अचानक घट झाल्याने रक्तदाब वाढतो. आणि हृदयाच्या चलनवलनावर ताण येतो. यातून हृदयविकाराचा धक्का बसण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे दररोज रात्री ७ – ८ तास झोप घेणे आवश्यक असते.
प्रक्रिया केलेले पदार्थ – मैदायुक्त पदार्थ, वेफर्स, चिप्स, बिस्किट्स या पदार्थांमध्ये सोडियम जास्त प्रमाणात असते. याचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो. जास्त मीठ रक्तात पाणी आणते, प्रक्रिया केलेले अन्न वजन वाढवते. यामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो.
एकटेपणा – आजच्या काळात अनेक सामाजिक, मानसिक समस्यांमुळे एकटेपणा वाढत आहे. पण आवडत्या माणसांची संगत मनास ताजेतवाने ठेवते. मनावरील ताण कमी होतो. नैराश्य येत नाही. कारण या सगळ्या गोष्टींचा थेट संबंध उच्च रक्तदाबाशी येतो.
वेदनाशामके – बऱ्याचजणांना वैद्यकीय सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेण्याची सवय असते. पण ही सवय खूप घातक ठरू शकते. या गोळ्यांच्या सेवनामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो.