
देवगडमधील बागवाडी खाडीकिनारी प्रस्तावित असलेल्या ‘काय गो देवगड’ या कयाकिंग बोटिंग प्रकल्पावरून पुन्हा एकदा वाद चिघळला आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमार बांधवांनी या प्रकल्पाच्या उद्घाटनाला तीव्र विरोध दर्शवत, ‘आमचा पर्यटन प्रकल्पांना विरोध नाही. मात्र हा प्रकल्प दुसऱ्या योग्य ठिकाणी सुरू करावा’, अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे उद्घाटन दुसऱ्यांदा रखडले.
स्थानिक ग्रामस्थांनी कयाकिंग बोटिंगसाठी दोन पर्यायी जागा सुचवल्याचे समोर आले आहे. मात्र, सुचवलेल्या जागांवर सुट्टीच्या काळात मोठय़ा प्रमाणात चिखल साचत असल्याने तेथे पर्यटकांना बोटिंगचा आनंद घेणे सोयीचे ठरणार नाही, असे बोटिंग व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सुचवलेल्या जागांऐवजी त्यालगतच्या जागेवर कयाकिंग सुरू करण्याची भूमिका व्यावसायिकांनी मांडली. मात्र, संबंधित जागेवर स्थानिक मच्छीमारांच्या बोटी लागतात. त्यामुळे या जागेवर कोणत्याही परिस्थितीत कयाकिंग सुरू करू देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. परिणामी, दोन्ही बाजूंमधील वाद पुन्हा चिघळला आणि प्रकल्पाच्या उद्घाटनात पुन्हा अडथळा निर्माण झाला. या वादात हस्तक्षेप करत देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली.
मच्छीमारांच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष
स्थानिक ग्रामस्थ आणि बोटिंग व्यावसायिक यांच्यात कोणताही तोडगा निघू शकला नाही. आता या जेटीवर नेमकी काय कारवाई होणार आणि कयाकिंग बोटिंग प्रकल्पाचा मार्ग कसा निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे देवगडमध्ये पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे स्थानिक मच्छीमारांच्या पारंपरिक व्यवसायाचा आणि बोटी लावण्याच्या जागेचा प्रश्न उपस्थित होत आहे.


























































