भाजपला अजितदादा पालकमंत्री नकोत; पुण्याच्या पालकमंत्री पदावरून मिठाचा खडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे जिह्यात राजकीय दृष्टय़ा प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पालकमंत्रिपदावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह जिह्यातील काही नगरपालिका आणि भाजप आमदारांची संख्या जास्त असल्याने पालकमंत्रीपद हे भाजपकडेच ठेवावे, असा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे.

अजित पवार यांनी मिंधे-भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात शपथविधी घेतल्यानंतर पुणे जिह्यातील राजकीय परिस्थिती ढवळून निघाली आहे. मावळचे सुनील शेळके, वडगाव शेरीचे सुनील टिंगरे आणि इंदापुरातील दत्तात्रय भरणे हे दोन आमदार वगळता, अजित पवार गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी कोण आमदार जाणार, हे अद्यापि स्पष्ट नाही. त्यामुळे एकूणच अजित पवार गटाचे पुणे जिह्यातील वर्चस्व भाजपच्या तुलनेत कमी आहे.

अद्यापि खातेवाटप झालेले नसले, तरी पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे येणार, अशा चर्चा सुरू असल्याने भाजपकडूनदेखील पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवार गटाला देण्यास विरोध होत असल्याचे चित्र समोर आले आहे. सद्यःस्थितीत चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना बदलून अजित पवार यांच्याकडे पालकमंत्रिपदाची सूत्रे पुणे, पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच ग्रामीण भागात भाजपने केलेल्या बांधणीला ब्रेक लागेल, असे कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मत आहे.

पालकमंत्री असलेल्या व्यक्तीला संपूर्ण जिल्हा प्रशासनाची बैठक बोलाविण्याचे अधिकार आहेत. तसेच जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्षदेखील पालकमंत्री असल्याने जिह्यातील विकासकामांसाठी निधीवाटप आणि सध्या प्रशासक राजवट असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषद, तसेच जिह्यातील पंचायत समित्यांवर एक प्रकारे पालकमंत्र्यांचे संपूर्ण वर्चस्व आहे. अशा स्थितीत अजित पवारांकडे पालकमंत्रिपद गेल्यास भाजप बॅकफूट जाऊ शकतो. तसेच अजित पवार यांना संपूर्ण जिल्हा आंदण दिल्यासारखे होईल, अशी प्रतिक्रिया एका भाजप नेत्याने व्यक्त केली.