25 कोटींच्या लाच प्रकरणी सॅम डिसूझाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणातील लाच आणि खंडणी वसुलीचा आरोप असलेला खबरी सॅनव्हिल एड्रियन डिसुझा याचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयाच्या या निर्णयाला डिसुझा उच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे.

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानची सुटका करण्यासाठी 25 कोटी रुपयांच्या लाच आणि खंडणी मागितल्या प्रकरणी सहआरोपी असलेल्या खबरी सॅनव्हिल एड्रियन उर्फ सॅम डिसुझाकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एम. मेंजोगे यांच्यासमोर शुक्रवारी सुनावणी झाली होती. त्यावेळी राखून ठेवलेला निकाल बुधवारी जाहीर करून डिसुझाविरोधात तपास यंत्रणेने केलेल आरोप गंभीर स्वरुपाचे असून त्याची चौकशी हे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला.

आर्यन खानची सुटका करण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एनसीबीचे माजी मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे आणि डिसुझासोबत पाच आरोपींवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) 11 मे रोजी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी 24 मे रोजी डिसुझाला समन्स बजावले होते. मात्र त्याला अटक करण्यात येऊ शकते, या भीतीपोटी डिसुझाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, इतक्या घाईने न्यायालयात का आलात? अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज का नाही केला?, अशी विचारणा करून न्यायालयाने त्याला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. म्हणून डिसुझाने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे अटकेची भिती निर्माण झाली असून सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला डिसुझा उच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे.