पारनेर पोलीस लॉकअपमधील 17 कैद्यांना कोरोना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पारनेर पोलीस ठाण्याच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या 15 कैद्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे सोमवार स्पष्ट झाले. यापूर्वी दोन कैद्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित कैद्यांची संख्या 17 झाली आहे.

पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याने केल्यानंतर त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. उपचारादरम्यान या आरोपीची कोविड चाचणी करण्यात आली. या चाचणीतून आरोपीला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले तसेच या आरोपीच्या पोटात पाणी झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे या आरोपीला पुढील उपचारासाठी ससून (पुणे) रुग्णालयात हलवण्यात आले.

न्यायालयीन कोठडीतील आरोपी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर पारनेर पोलीस ठाण्याच्या इतर बराकींमध्ये असलेल्या पोलीस व न्यायालयीन कोठडीत असलेल्या इतर 46 कैद्यांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी 15 जणांचे चाचणी अहवाल सकारात्मक आले. पारनेर पोलीस ठाण्याच्या कोठडीतील आरोपी एकाचवेळी मोठय़ा संख्येने कोरोनाबाधित आढळल्याने पारनेर पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कैद्यांना न्यायालयापुढे हजर करणे, वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यासाठी पोलीस कर्मचाऱयांचा कैद्यांशी वारंवार संपर्क येतो तसेच बंदोबस्तासाठी असणारे पोलीस कर्मचारी कैद्यांच्या जवळून संपर्कात असतात. त्यामुळे पारनेर पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

बोठेच्या बराकीतील तिघे पॉझिटिव्ह, बोठे निगेटिव्ह

यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला इतर 11 कैद्यांसह एका बराकीत ठेवण्यात आले आहे. या बराकीतील बोठेसह इतर 11 कैद्यांची कोविड चाचणी करण्यात आली असता, तीन कैद्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. बोठेचा तपासणी अहवाल नकारात्मक आला.