
राज्यात कोरोना नियंत्रणात असून रुग्णांची संख्या घसरत असताना कोरोनाचा नवीन व्हेरिएंट बीए 4, बीए 5 व बीए 2.75 व्हेरिएंटचा प्रसार झपाट्याने होत आहे. पुण्यात आज बीए 4 आणि बीए5 चे 19 तर बीए 2.75 व्हेरिएंटचे 17 रुग्ण आढळल्याने राज्याच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए 4 आणि बीए 5 रुग्णांची संख्या 132 तर बीए 2.75 रुग्णांची संख्या 57 वर पोहोचली आहे.
पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालानुसार राज्यात बीए 4 चा 1 तर बीए 5 चे 18 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय बीए 2.75 व्हेरिएंटचेदेखील 17 रुग्ण सापडले आहेत. सर्व रुग्ण पुण्यातील आहेत. या नमुन्यांची तपासणी पुणे आणि मुंबई येथील इन्साकॉग अंतर्गत प्रयोगशाळांमध्ये करण्यात आले आहे. हे सर्व नमुने 25 जून ते 4 जुलै 2022 या कालावधीतील आहेत. या रुग्णाचा खोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत असल्याचे राज्य सरकारच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
बीए-4 आणि 5 चे रुग्ण
पुणे -84, मुंबई -33, नागपूर ठाणे पालघर – प्रत्येकी 4, रायगड -3
बीए- 2.75 चे रुग्ण
पुणे 37, नागपूर – 14, अकोला, ठाणे, यवतमाळ प्रत्येकी एक रुग्ण.
राज्यात 2,186 तर मुंबईत 276 रुग्ण
राज्यात आणि मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. राज्यात आज दिवसभरात 2 हजार 186 रुगण सापडले, तर तिघा जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आज 276 रुग्ण सापडले तर 2 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, दिवसभरात 2 हजार 179 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली असून ती 15 हजार 525 वर पोहोचली आहे. मुंबईत आज 397 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 300 वर पोहोचली आहे.


























































