कोरोना काळात कार्यालयात साजरा केला वाढदिवस, नेवाशाच्या तहसीलदारांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचे नियम न पाळता नेवाशाचे तहसिलदार रूपेशकुमा सुरूणा यांनी 10 ते 15 कर्मचाऱ्यांसमवेत 23 जून 2020 रोजी कार्यालयात वाढदिवस साजरा केला होता. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने नेवासा पोलिसांत तहसीलदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय जानकू नारळे (रा. माळीचिंचोरे) यांनी फिर्याद दिली आहे. नेवाशाचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी स्वतःचा वाढदिवस शासकीय कार्यालयात 10 ते 15 कर्मचाऱ्यांसह मास्क न लावता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता व 5 पेक्षा जास्त व्यक्ती जमवून धुमधडाक्यात साजरा केला होता. याबाबत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. मात्र, तरीही तहसीलदार सुराणा यांच्यावर कारवाई न केल्याने नारळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात क्रिमिनल रिट पिटीशन दाखल केले होते.

न्यायालयाने 30 जुलै 2021 रोजी निकाल देऊन संबंधित पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नेवासा पोलिसांत तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.