ऑलिम्पिक रद्दच्या मोहिमेत आता गुंतवणूकदारांचीही उडी, टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाला वाढतोय विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑलिम्पिकचे आयोजन म्हटल्यावर संबंधीत देशाला राजकीय आणि आर्थिक फायदा उठविण्याची मोठी संधी असते. मात्र कोरोना महामारीमुळे टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनावर संकटाचे काळे ढग जमा झाले आहेत. कोरोनाच्या संकटात ऑलिम्पिकचे आयोजन रद्द करणेच शहाणपणाचे ठरेल, असे जपानमधील स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. टोकियो ऑलिम्पिक रद्द झाले तरच आपला फायदा होईल, असेही त्यांना वाटतेय. म्हणूनच ऑलिम्पिक रद्दच्या मोहिमेत आता जपानमधील गुंतवणूकदारांनीही उडी घेतली आहे.

जपानमधील एका स्थानिक वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. टोकियो ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यावरील दबाव रोजच वाढत चालला आहे. एकतर देशातील जनमत या ऑलिम्पिकविरोधात आहे. विरोधी पक्षानेही ही स्पर्धा रद्द करण्यासाठी मोठा विरोध सुरू केलाय. अशातच आता जपानमधील निधी व्यवस्थापक, व्यापारी यांनीही अशा प्रतिकूल परिस्थितीत टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन म्हणजे जुगार ठरेल, असे परखड मत व्यक्त केले आहे. क्रीडाविश्वातील या सर्वेच्च स्पर्धेच्या आयोजनामुळे कोरोना महामारीची नवी लाट येऊ शकते, अशी भीतीही त्यांना सतावत आहे. ऑलिम्पिकमुळे कोरोनाची चौथी लाट आली तर जपानचे आर्थिक कंबरडे मोडले जाईल, असेही तेथील गुंतवणूकदारांना वाटतेय.

ऑलिम्पिक रद्द होणेच फायद्याचे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ऑलिम्पिक रद्द होणेच अधिक फायद्याचे ठरेल, असे बहुतांश जपानी नागरिकांना वाटत आहे. या स्पर्धेच्या आयोजनामुळे देशात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते, अशी भीती त्यांना वाटतेय. कारण ऑक्टोबर महिन्यात जपानमध्ये निवडणुका होणार आहेत. टोकियो ऑलिम्पिकमुळे देशात महामारी फोफावली तर पंतप्रधान सुगा आणि त्यांच्या पक्षाला याचा मोठा फटका बसू शकतो. कोरोनामुळे परदेशी पर्यटकही येणार नसल्याने ऑलिम्पिकमधील आर्थिक गणितही बिघडले आहे. त्यामुळे हे ऑलिम्पिक न झालेले बरे, असे जपानी जनतेचे मत बनले आहे.

परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय

टोकियो स्टॉक एक्सचेंजमध्ये सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. लसीकरणाचा वेग मंदावल्याने त्याचा तेथील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. या महिन्यातील दुसऱया आठवडय़ात परदेशी गुंतवणूकदारांनी जवळपास सक्वानऊ अब्ज डॉलरची गुतवणूक टोकियो स्टॉक एक्सचेंजमधून काढून घेतली आहे. गतवर्षी मार्चनंतर पहिल्यांदाच इतकी मोठी रक्कम परदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतली आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिक रद्द होण्याच्या मोहितेत आता जपानमधील गुंतवणूकदारांनीही उडी घेतली आहे.

…तर जपानला मोठा आर्थिक फटका

कोरोनाच्या संकटामुळे ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा रद्द कराव्या लागल्या तर जपानचे 1.81 ट्रिलियन योन म्हणजेच जवळपास 17 बिलियन डॉलरचे नुकसान होऊ शकते, असे नोमुरा रिसर्च इंस्टीटय़ूटचे म्हणणे आहे. जपानमध्ये नुकतेच क्योडो न्यूज एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणात 72 टक्के स्थानिक जनतेचा टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाला विरोध आहे. मात्र ही स्पर्धा न झाल्यास जपानला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी जपानने कंबर कसली आहे. स्पर्धेच्या आयोजनाला दोन महिन्यांचा कालावधी राहिल्याने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनेही (आयओसी) यात जातीने लक्ष घातले आहे.