मालिका पुन्हा ‘ऍक्शन’ मोडमध्ये! परराज्यातील पॅकअप करून ओरिजनल सेटवर परतल्या

कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे राज्यात शूटिंगवर बंदी घातली होती. राज्य सरकारने नियम आणि अटींसह शूटिंगला परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून राज्याबाहेर गेलेली मालिकांची टीम आता तिथले पॅकअप करून राज्यात परतली आहे. याच आठवडय़ात मालिकांच्या मुख्य सेटवर शूटिंगला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कलाकारांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.

सिलकासामधील शूटिंग संपवून नुकतीच आमची टीम परतली आहे. लवकरच ठाण्यात मालिकेच्या मुख्य सेटवर आम्ही शूटिंगला सुरुवात करू. गेले दोन महिने नवीन ठिकाणी शूटिंग करताना आम्ही मुख्य सेटला आणि आमच्या कुटुंबियांना खूप मिस केले होते. आपल्या घरी परतल्याचा खूप आनंद आहे. – शाल्क किंजवडेकर, अभिनेता (येऊ कशी तशी मी नांदायला)

आपल्या कुटुंबापासून लांब राहून काम करणं फार कठीण होतं. मुंबईत शूटनंतर घरी जाऊन कुटुंबासोबत वेळ घालवणं हे दुसऱया दिवशी शूट करण्यासाठी उत्साह देतं. महाराष्ट्राबाहेर शूट करण्याचा वेगळा अनुभव नक्कीच मिळाला; पण आता पुन्हा आपल्या मुंबईत शूट सुरू होतंय याचा आनंद काही वेगळाच आहे. – माधवी निमकर, अभिनेत्री (सुख म्हणजे नक्की काय असतं)

सिलकासामध्ये आम्ही दोन महिने शूटिंग केले. पहिले एक-दोन आठकडे नवीन सेटची ओळख होण्यातच गेले. मालिकेचा सेट, मुंबईतील आमचं घर आणि घरातलं जेकणं या गोष्टी खूप मिस केल्या. पुन्हा मुंबईत कधी परतणार हे माहीत नसल्याने लेखकांना आयत्या वेळी कथानकात बदल करावे लागत होते. आता पुन्हा मुंबईत परतल्याचा आनंद आहे. सध्या इथल्या सेटवर शूटिंगची तयारी सुरू असल्याने आम्हाला छोटासा ब्रेक मिळालाय. पुढच्या दोन-तीन दिवसांत आम्ही शूटिंगला सुरुवात करू. – विराजस कुलकर्णी, अभिनेता, (माझा होशील ना)

आपली प्रतिक्रिया द्या