
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात येत्या सोमवार, 24 जानेवारीपासून शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. शाळा सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मान्यतेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
शिक्षण क्षेत्रात काम करणाऱया विविध संघटना, संस्था, विद्यार्थी तसेच पालकवर्गाकडूनही कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्तांना स्थानिक स्तरावर आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचे सर्वाधिकार देण्यात यावेत, असा प्रस्ताव सादर केला आहे.
मुंबईतील शाळा 27 जानेवारीपासून?
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा 27 जानेवारीपासून सुरू करण्याबाबत विचार असल्याचे सांगितले.

























































