कोरोना रुग्णसंख्येत, मृत्यूंमध्ये घसरण; दिवसभरात 1,839 रुग्ण, 11 जणांचा मृत्यू 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात गेल्या आठवडय़ाभरापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत तसेच कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात सुरू असलेली घसरण कायम आहे. देशात आज दिवसभरात रविवारच्या तुलनेत 600 रुग्णांची घट झाली असून 1 हजार 839 रुग्ण सापडले तर 11 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, सक्रिय रुग्णांची संख्या 27 हजार 212 वरून 25 हजार 178 वर पोहोचली आहे.

देशभरात 1 जानेवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा झपाटय़ाने वाढू लागली. मार्च आणि एप्रिल महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्येने 11 हजारांचा टप्पा गाठला होता. त्यामुळे मे महिन्यात दरदिवशी सरासरी कोरोना रुग्णांची संख्या ही आणखी वाढेल, अशी भीती केंद्रीय टास्क फोर्स आणि केंद्रीय आरोग्य खात्याने व्यक्त केली होती. मात्र, एप्रिलच्या अखेरीपासून आतापर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी घट झाली आहे. दरदिवशी होणाऱ्या मृत्यूंची संख्या 44 वरून 11 वर आली आहे तर 67 हजारांवर पोहोचलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 25 हजारांवर पोहोचली आहे.

राज्यात 76 रुग्ण, एकाचा मृत्यू

मुंबईसह राज्यात जानेवारीपासून वाढत गेलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पहिल्यांदा 100च्या आत आली आहे. राज्यात आज 76 रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाला. 176 जण कोरोनामुक्त झाले तर 2 हजार 515 चाचण्या करण्यात आल्या. सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 527 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईतही रुग्णांची संख्या कमी झाली आहे. दिवसभरात 28 रुग्ण सापडले तर 60 जण कोरोनामुक्त झाले. सक्रिय रुग्णांची संख्या 420 वर पोहोचली आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला असून त्याला उच्चरक्तदाब आणि यकृताचे विकार होते.