कोरोनाचा संसर्ग, इंग्लंडचा संपूर्ण संघच बदलला; पाकिस्तानविरुद्ध नवा संघ मैदानात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडमध्ये येत्या 19 जुलैपासून कोरोनासंबंधीचे प्रतिबंध हटविले जाणार आहेत. मात्र त्यापूर्वीच इंग्लंडच्या क्रिकेट संघाला मोठा धक्का बसलाय. पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या दोन दिवस आधीच यजमान संघाचे 3 खेळाडू आणि 4 सहाय्यक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडला संपूर्ण नवा संघ खेळवावा लागणार असून या संघाची धुरा अष्टपैलू बेन स्टोक्सच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.

इंग्लंड-पाकिस्तान दरम्यान 8 जुलैपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. कोरोनाने संघात शिरकाव केला असला तरी ही मालिका वेळापत्रकानुसारच होईल, असे इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे. बेन स्टोक्स संघात परतला असून त्याला एकदिवसीय आणि टी-20 या दोन्ही मालिकांसाठी कर्णधार बनविण्यात आले आहे. इंग्लंडचा हा अष्टपैलू खेळाडू कारकिर्दीत प्रथमच कर्णधार झाला आहे. इंग्लंड-पाकिस्तान दरम्यान तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे.

ब्रिस्टर येथे सोमवारी झालेल्या पीसीआर टेस्टमध्ये इंग्लंडच्या एकदिवसीय संघातील तीन खेळाडू आणि चार व्यवस्थापनामधील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे, असे ईसीबीने म्हटले आहे. या खेळाडूंच्या संपका&त आलेल्या लोकांना इंग्लंड सरकारच्या नियमानुसार स्वतःला 4 जुलैपर्यंत सेल्फ आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. संघातील अन्य सदस्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनादेखील आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले आहे. याआधी इंग्लंडचा संघ श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळत होता. या मालिकेतील खेळाडू आता विलगीकरणात आहेत.

इंग्लंडचा नवा एकदिवसीय संघ

बेन स्टोक्स (कर्णधार), जेक बॉल, डॅनी ब्रिग्स, ब्रिडन पॅर्स, जॅक क्राउली, बेन डकेट, लुईस ग्रेगरी, टॉम हेल्म, विल जॅक्स, डॅन लॉरेन्स, सकीब महमूद, डेवीड मलान, व्रेग एवर्टन, मॅट पार्पिंसन, डेवीड पेन, फिल साल्ट, जॉन सिम्पसन, जेम्स विंस.

‘‘डेल्टा व्हेरिएंटच्या सुरुवातीस बायो बबलच्या विश्रांतीनंतर धोका वाढला आहे. आम्ही खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱयांच्या सुधारणेसाठी प्रोटोकॉलचा नियम बनविला आहे. गेल्या 14 महिन्यांत प्रत्येकाने पाठिंबा दर्शवला आहे. आम्ही या मालिकेसाठी आणखी एक संघ तयार करीत आहोत.’’
– टॉम हॅरिसन, ईसीबीचे मुख्य कार्यकारी