चंद्रपूरमध्ये खासगी बसमधून आलेल्यांच्या हातावर ‘पुणे रिटर्न-घरी बसा’ शिक्के नाहीत

5420

>> अभिषेक भटपल्लीवार

चंद्रपूरात एकीकडे जिल्हा प्रशासनाने पुण्याहून परतलेल्या रेल्वे प्रवाशांना काल पूर्ण तयारीनिशी ‘पुणे रिटर्न-घरी बसा’ चे शिक्के मारले. दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्सने आज शहरात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना मात्र मोकळे सोडल्याचे धक्कादायक चित्र पुढे आले आहे.

शहरात आज सकाळपासून पुण्याहून दाखल झालेल्या 8 ते 10 खाजगी ट्रॅव्हल्स मधून किमान 300 विद्यार्थी-प्रवासी शहरात आले. त्यांच्या नोंदीची आणि home quarantine शिक्के मारण्याची कुठलीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यांची कुठलीही तपासणी झाली नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका मात्र वाढला आहे. शहरात कडकडीत जनता संचारबंदी असताना ट्रॅव्हल्स मात्र मोकाटपणे प्रवासी आणत आहेत. याच पुण्यातील प्रवासी बस शहरात दाखल झाल्यावर त्यांची तपासणी अथवा निर्जंतुकी करणं न झाल्याने स्थानिक मात्र संतप्त झाले. पुण्याहून आलेल्या प्रवाशांनी आपली औरंगाबाद टोलनाक्यावर तपासणी झाली असून योग्य ती काळजी घेतल्याचे सांगितले. मात्र या गाड्या आणि प्रवासी शहरात आल्यावर त्याची थर्मल स्क्रीनिंग अथवा stamping न झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या