
देशात कोरोना संसर्गाचा अक्षरशः विस्फोट झाला असून, 24 तासांत 2 लाख 739 नवे रुग्ण आढळले आहेत, तर 1038 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे.
देशात कोरोनाची दुसरी लाट झपाटय़ाने पसरली आहे. रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होत असताना अनेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाही. देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा प्रचार आणि हरिद्वार येथे कुंभमेळ्यात उसळलेली लाखोंची गर्दी यामुळे कोरोना संसर्ग आणखी वाढण्याची भीती आहे.
14 दिवसांत झपाटय़ाने रुग्णवाढ
- 1 एप्रिल रोजी देशात 81 हजार 398 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यानंतर रोज झपाटय़ाने रुग्णवाढ होत आहे. 4 एप्रिलला 1 लाख रुग्णसंख्येचा टप्पा पार झाला.
- 10 एप्रिल रोजी 1 लाख 52 हजारांवर रुग्ण आढळले, तर 14 एप्रिलला 2 लाखांवर रुग्णसंख्या गेली आहे.
- मृतांची संख्याही रोज वाढत आहे. 1 एप्रिलला 468 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 13 एप्रिल रोजी 1027, तर 14 एप्रिलला 1038 रुग्णांनी प्राण गमावले.
काय आहे स्थिती?
- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत 2 लाख 739 नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 40 लाख 74 हजारांवर गेली आहे.
- 24 तासांत 1038 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 73 हजार 123 नागरिकांना प्राण गमवावे लागले.
- सध्या देशात 14 लाख 71 हजारांवर रुग्णांवर उपचार सुरू आहे.
- आतापर्यंत देशात 11 कोटी 44 लाख 93 हजार 238 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत.




























































